ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने 16 वर्षीय युवकाची आत्महत्या
किरण गोटूर. प्रतिनिधी. नाशिक: ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरल्यामुळे सोळा वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात घडली आहे. आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचे नाव सम्राट भालेराव आहे. सम्राट हा नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड येथे राहत होता. 'गेल्या अनेक दिवसांपासून सम्राटला मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्याचा नाद होता', असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
हेही वाचा: बेटिंग ॲप घोटाळ्यात राणा डग्गुबतीसह 29 कलाकार कायद्याच्या कचाट्यात
बुधवारी रात्रीच्या सुमारास एका ऑनलाईन गेममध्ये सम्राट पैसे हरला. पैसे हरल्याचा नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच जीवन संपवलं. या घटनेने परिसर हळहळला आहे. सम्राटच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. घरात एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवर कुटुंबीयांची मोठी जबाबदारी होती. मात्र, त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुख्य म्हणजे, या घटनेनंतर जुगार खेळवणाऱ्यांवर पोलीस यंत्रणा कारवाई करतील का? हा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.