देशरक्षणासाठी जीव झोकून देणाऱ्या सैनिकांसाठी नागपू

सीमेवरील जवानांसाठी नागपूरहून पाठवण्यात आल्या 3 लाख राख्या

नागपूर: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रहार समाज जागृती संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवर तैनात भारतीय जवानांसाठी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशरक्षणासाठी जीव झोकून देणाऱ्या सैनिकांसाठी नागपूरहून तब्बल 3 लाख राख्या पाठवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमात आर्मी पोस्टल सर्व्हिसच्या कर्नल लव्हलिना यांच्याकडे या राख्या औपचारिकरीत्या सुपूर्द करण्यात आल्या.

गेल्या वर्षी पाठवण्यात आलेल्या 2.5 लाख राख्यांमध्ये यावर्षी 50 हजार राख्यांची वाढ झाली आहे. गेल्या 31 वर्षांपासून संस्था हा उपक्रम सलग राबवत आहे, ज्यात विद्यार्थ्यांनी नुसत्या राख्याच नाही, तर प्रेमळ संदेशही जोडले आहेत. या उपक्रमात नागपूरमधील 30 हून अधिक शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने राख्या तयार केल्या व त्या सीमेवर पाठवण्यासाठी दिल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी कर्नल लव्हलिना व इतर जवानांना राखी बांधून त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.

हेही वाचा - दु:खद घटना! पंढरपूरमधील चंद्रभागा नदीत 3 महिलांचा बुडून मृत्यू

दरम्यान, कर्नल लव्हलिना यांनी म्हटलं आहे की, 'या राख्या सैनिकांना मानसिक बळ देतात. जेव्हा सैनिक हे पाहतात की त्यांच्यासाठी देशातील भावंडं राख्या पाठवत आहेत, तेव्हा त्यांना नवे बळ मिळते. या राख्यांमुळे त्यांना असे वाटेल की ते एकटे नाहीत, संपूर्ण देश त्यांच्या मागे आहे, संपूर्ण देश त्यांचा परिवार आहे. हे एक प्रकारे देशसेवेचे स्मरण आहे.'

हेही वाचा - इस्लामपूरचं नाव बदलणार! आता 'या' नावाने ओळखलं जाणार शहर

तथापी, प्रहार समाज जागृती संस्थेच्या सचिव निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी सांगितलं की, 3 लाख राख्यांसोबतच, प्रहारच्या विद्यार्थ्यांनीही देशातील सैनिकांसाठी काही संदेश पाठवले आहेत. बऱ्याच वेळा सैनिकांना सुट्टी मिळत नाही आणि ते घरी जाऊन रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या कुटुंबाला राखी बांधू शकत नाहीत, म्हणून संस्थेची मुले या राख्या पाठवतात. संस्थेचे ध्येय पुढील वर्षी 3 लाख राख्यांची संख्या 4 लाखांपर्यंत वाढवण्याचे आहे.