GBS Outbreak: राज्यात गिलेन-बॅरे सिंड्रोमच्या 3 नवीन संशयित रुग्णांची नोंद; एकूण रुग्णांची संख्या 173 वर पोहोचली
GBS Outbreak In Maharashtra: राज्यात आज गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे तीन नवीन संशयित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात आता गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) झाल्याचा संशय असलेल्यांची संख्या 173 वर पोहोचली आहे. तथापी, या सिंड्रोममुळे झालेल्या संशयित मृत्यूंची संख्या सहा झाली आहे. यापैकी 140 रुग्णांना गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) असल्याचे निदान झाले. आतापर्यंत एकूण 6 जणांचा या आजाराने जीव गेला आहे.
21 रुग्ण व्हेंटिलेटरवर -
जीबीएसचे सुमारे 32 रुग्ण पुणे महानगरपालिकेतील (पीएमसी) आहेत, पीएमसीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील 82, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 22, पुणे ग्रामीणमधील 22 आणि इतर जिल्ह्यांतील आठ रुग्ण आहेत. यापैकी 72 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे, 55 आयसीआरमध्ये असून 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जीबीएस हा असा दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे अचानक थकवा येतो आणि स्नायू कमकुवत होतात, ज्यामध्ये हातपायांमध्ये तीव्र कमजोरी आणि हालचाल यासारख्या लक्षणांचा समावेश असतो. डॉक्टरांच्या मते, बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गामुळे जीबीएसचा संसर्ग होतो. जीबीएसचा संसर्ग झाल्याने रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. जीबीएसच्या गंभीर प्रकरणांमध्ये जवळजवळ संपूर्ण पक्षाघात होऊ शकतो.
हेही वाचा - रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणं पडलं महागात! ट्रेनने धडक दिल्याने ठाण्यात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू
जीबीएस म्हणजे काय आणि त्याचा रुग्णाच्या शरीरावर काय परिणाम होतो?
गिलेन-बॅरे सिंड्रोम, हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो सामान्यतः दर 100,000 लोकांपैकी एक किंवा दोन लोकांना प्रभावित करतो. या आजारात, आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच आपल्या परिधीय नसांवर हल्ला करते. संसर्गाशी लढण्यासाठी आपल्या शरीरात निर्माण होणारे अँटीबॉडीज मज्जातंतूंच्या आवरणावर हल्ला करू लागतात, ज्याला मायलिन आवरण म्हणतात. ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि आपले हात आणि पाय व्यवस्थित काम करणे थांबवतात.