31 किलो गांजा जप्त; मुंबई - आग्रा महामार्गावर तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
धुळे: धुळे तालुक्यातील पोलिसांनी मोठी कारवाई करत चारचाकी वाहनातून गांजाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई मुंबई-आग्रा महामार्गावर करण्यात आली असून पोलिसांनी तब्बल 31 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.
शिरपूर ते मालेगाव दिशेने पाठवला जात होता गांजा:
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरमधून गांजाची अवैधरित्या तस्करी करत मालेगावच्या दिशेने गांजा पाठवला जात होता. मात्र, धुळे तालुक्यातील पोलिसांनी डेहराडून शेर पंजाब हॉटेलजवळ सापळा रचला. थोड्याच वेळात एक संशयित चारचाकी वाहन त्या मार्गावरून जाताना पोलिसांच्या निदर्शनात दिसले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या चारचाकी वाहनाला थांबवले आणि झडती घेतली. या दरम्यान, पोलिसांना चारचाकी वाहनाच्या डिक्कीतून तब्बल 31 किलो गांजा आढळून आला.
9 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त:
या कारवाईमध्ये, पोलिसांनी एकूण 9 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गांजा आणि वापरण्यात आलेली चारचाकी गाडीचाही समावेश आहे. सध्या, पोलिस या तस्करीमागील संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. 'हा गांजा कोठून आणला गेला? कोणाकडे पोहोचवला जाणार होता? तसेच या तस्करीत आणखी कोण सहभागी आहेत?', याचा तपास पोलिस करत आहेत.