कुंडमळ्यात पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू; दुर्घटनेतून 38 जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश
पुणे: मावळमध्ये कुंडमळ्यात 30 वर्ष जुना पूल कोसळला असून त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतून 38 जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश मिळाले आहे. अंदाजे 5 ते 7 जण वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील मावळमध्ये कुंड मळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे.
हेही वाचा : Ajit Pawar On Indrayani Bridge: 'कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी'
नेमकं काय घडलं ? रविवार असल्यानं कुंडमाळा येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. दुपारी 3:30 वाजता कुंडमळा येथे इंद्रायणी पूल कोसळला. दुर्घटनेत सुमारे 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती मिळाली. तत्परतेनं एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफनं समयसूचकता दाखवत 38 जणांना वाचवलं. तपासात दोन जणांचे मृतदेह मिळाले. शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींचा खर्चही शासनानं उचलला. तपास यंत्रणेला स्थानिकांनी मोठं सहकार्य केलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय म्हणाले अजित पवार? कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.