Bomb Threat: '34 वाहनांमध्ये 400 किलो RDX...'; वाहतूक पोलिसांना धमकी, मुंबईत हाय अलर्ट जारी
Bomb Threat In Mumbai: मुंबईत दहशतीचे सावट पसरले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजमध्ये शहरात 400 किलो आरडीएक्सचा वापर करून मोठे स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीत म्हटले आहे की 34 वाहनांमध्ये 'मानवी बॉम्ब' बसवण्यात आले आहेत आणि हे स्फोट संपूर्ण मुंबई हादरवून टाकतील.
ही धमकी ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेकडून देण्यात आल्याचे समोर आले आहे. संदेशात 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा केला गेला आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, या धमकीची चौकशी सुरू असून राज्यभर उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे.
खोट्या धमक्या वाढल्या
गेल्या काही महिन्यांत मुंबईसह देशभरात खोट्या धमक्या वाढल्या आहेत. शाळा, विमानतळ, हॉटेल्स आणि सरकारी कार्यालयांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या वारंवार मिळाल्या आहेत. मे 2025 मध्ये महाराष्ट्र सचिवालयाला 48 तासांत स्फोट होईल, अशी धमकी देण्यात आली होती, मात्र ती खोटी निघाली.
दरम्यान, याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेललाही बॉम्बची धमकी देण्यात आली होती. 2024 मध्ये तर मुंबई आणि दिल्लीतील शाळांना हजारो बनावट धमक्या आल्या होत्या. सद्यस्थितीत मुंबई पोलिसांनी धमकी गांभीर्याने घेत तपास आणि चौकशी सुरू केली आहे. एनएसजी, एटीएस आणि गुप्तचर यंत्रणा देखील सतर्क आहेत.