हा अपघात 5 ऑगस्ट रोजी गोरेगाव चेक नाक्यावर घडला. अ

गोरेगावमध्ये झालेल्या अपघातात 53 वर्षीय चित्रपट कलाकार महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई: गोरेगाव पूर्व येथे झालेल्या अपघातानंतर उपचारादरम्यान 53 वर्षीय कनिष्ठ चित्रपट कलाकार अंबुबाई सोनवणे यांचा मृत्यू झाला. हा अपघात 5 ऑगस्ट रोजी गोरेगाव चेक नाक्यावर घडला. अंबुबाई सोनवणे या त्यांच्या 29 वर्षीय ओळखीच्या शुभम घाटवालच्या मोटारसायकलवर मागे बसल्या होत्या. घाटवालने बेस्ट बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे अंबुबाई सोनवणे गंभीर जखमी झाल्या.

हेही वाचा - दिल्लीतील जैतपूर परिसरात मोठी दुर्घटना; भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबुबाई सोनवणे या गोरेगाव पूर्वेतील शांती निकेतन येथे कुटुंबासह राहत होत्या. 4 ऑगस्ट रोजी त्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता घरी परतताना त्यांना घाटवाल भेटले. त्यांनी अंबुबाई सोनवणे यांनी घरी सोडतो असं सांगितलं. प्रवासादरम्यान गोरेगाव चेक पोस्टकडे जाताना हा अपघात घडला.

हेही वाचा - चालत्या बसवर कोसळले झाड; चालकासह 5 जणांचा मृत्यू

अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंबुबाई सोनवणे यांना प्रथम अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले, परंतु प्रकृती खालावल्याने त्यांचा मुलगा त्यांना जोगेश्वरी पूर्वेतील ट्रॉमा केअर रुग्णालयात घेऊन गेला. तिथे 6 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.