शिवम चिकणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आ

बीडमध्ये प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट! 21 वर्षीय तरुणाची हत्या

बीड: बीड जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेवराई तालुक्यातील गंगावाडी गावात प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका 21 वर्षीय तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शिवम चिकणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. शिवम हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. शिवमला मुलीच्या कुटुंबियांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. यात शिवम गंभीर जखमी झाला होता. शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तरुणावर काठ्यांनी वार - 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगावाडी-तलवाडा रस्त्याने प्रवास करत असताना मुलीचे वडील गणेश यादव, भाऊ शिवम यादव आणि अन्य तिघांनी शिवमवर काठ्यांनी वार केले. या हल्ल्यात तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, शिवमचा जीव वाचू शकला नाही. 

हेही वाचा - पायलटकडून एअर होस्टेसवर बलात्कार; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तलवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्नील कोळी यांनी सांगितले की, आरोपींवर सुरुवातीला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता गुन्हा भारतीय न्याय संहितेनुसार हत्येच्या कलमांतर्गत वर्ग करण्यात आला आहे. 

हेही वाचा - किडनी विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून दहिसरमधील तरुणाची 3 लाखांची फसवणूक

पोलिसांनी महिलेचे वडील गणेश यादव आणि भाऊ शिवम यादव यांच्यासह तिघांना अटक केली आहे. पीडित आणि आरोपी दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. प्रेमसंबंधाच्या आरोपावरून गुन्हेगारीचा हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे.