डोंबिवली पश्चिम परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर

Viral Video: फेरीवाल्याने डबक्यात साचलेल्या पाण्यात धुतली केळी

मुंबई: डोंबिवली पश्चिम परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोकुळ बंगल्याजवळील रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या घाणेरड्या पाण्यात दोन फळविक्रेते नियमितपणे केळी धुवून त्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. हा संतापजनक प्रकार जेव्हा ठाकरे गटाचे विभागप्रमुख राजेंद्र सावंत यांच्या निदर्शनात आले तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले.

या व्हिडिओत, एक फळ विक्रेता रस्त्यावर साचलेल्या अत्यंत घाणेरड्या पाण्यात केळी धुताना आणि नंतर ती विक्रीसाठी ठेवताना स्पष्टपणे दिसत आहे. या संतापजनक कृत्याबाबत जेव्हा ठाकरे गटाचे विभागप्रमुख राजेंद्र सावंत यांनी संबंधित फळ विक्रेत्याला जाब विचारले तेव्हा फळ विक्रेत्याने गुर्मीत उत्तर दिले  की, 'माझं नुकसान तुम्ही भरुन देणार का?'. 

या घटनेमुळे, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासह, डोंबिवलीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण अशा अशुद्ध पाण्यात फळांना धुतल्याने विविध आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, स्थानिक प्रशासनाकडून संबंधित विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.