‘अभिजात मराठी’ हा प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनपुरता मर्

मराठी मनोरंजनासाठी नवा अध्याय सुरु ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा

मुंबई: 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ म्हणून मिळालेला दर्जा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेचा ऐतिहासिक क्षण ठरला. या यशाचं रूपांतर आता एका महत्त्वाकांक्षी उपक्रमात झालं आहे  ‘अभिजात मराठी’ या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या घोषणेसह. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये, 1 मे 2025 रोजी पार पडलेल्या ‘राजभाषा मराठी दिन’ विशेष कार्यक्रमात या प्लॅटफॉर्मचा लोगो अनावरण करण्यात आला. मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

‘अभिजात मराठी’ हा प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनपुरता मर्यादित नाही, तर तो मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेचा आधुनिक प्रसारक ठरणार आहे. सुमन एंटरटेनमेंटच्या पुढाकारातून साकारलेला हा प्रकल्प 20 कोटी मराठी भाषिक प्रेक्षकांना एका डिजिटल व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या अनेक प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी सामग्रीला दुय्यम स्थान दिलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, हा उपक्रम एक स्वतंत्र मराठी जागा निर्माण करणार आहे. या व्यासपीठावर दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज, लघुपट तसेच मराठीत डब केलेले इतर भाषांतील चित्रपटही उपलब्ध असणार आहेत.

मराठी साहित्य, संस्कृती आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ या प्लॅटफॉर्मचा सॉफ्ट लॉन्च जुलै 2025 मध्ये 1000 निवडक प्रेक्षकांसाठी होणार असून, अधिकृत भव्य लॉन्च ऑक्टोबर 2025 मध्ये मराठी भाषा सप्ताहात होईल. संस्थापक केदार जोशी यांनी हा प्रकल्प केवळ एक व्यवसायिक कल्पना नसून ती ‘मराठीची डिजिटल चळवळ’ असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, 'ही भाषा केवळ टिकून राहावी म्हणून नव्हे, तर अभिमानाने बहरावी म्हणून आम्ही हे व्यासपीठ उभारत आहोत.' या प्लॅटफॉर्मवर नवोदित आणि अनुभवी निर्मात्यांना आपलं मराठी कंटेंट प्रसारित करण्यासाठी खुले निमंत्रण देण्यात आलं आहे, जे मराठी सर्जनशीलतेला नवसंजीवनी देणारं ठरेल.

मंत्री उदय सामंत यांनी या उपक्रमाचं कौतुक करताना सांगितलं की, 'मोबाईलवरून दररोज वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट पाहणाऱ्या नव्या पिढीला जर ‘अभिजात मराठी’ सारखं स्वतंत्र आणि दर्जेदार मराठी प्लॅटफॉर्म मिळालं, तर त्यातून भाषेचा प्रचार, प्रसार आणि संरक्षण सुसूत्रतेने होऊ शकतो.' अशा उपक्रमांमुळे मराठी भाषेची ओळख केवळ घरापुरती मर्यादित न राहता, जागतिक स्तरावर पोहोचण्याची नवी दिशा निश्चितच खुली होईल.