Ajit Pawar: एक मिनिट...ऐकायला शिक म्हणत अजित पवारांनी नेत्याला फटकारलं
बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा ते बऱ्याच गोष्टींवर सडेतोड बोलताना दिसतात. कामाच्या बाबतीत अजित पवार हे आग्रही असतात. त्यात कुचराई करणाऱ्या ते धारेवर धरत असतात. अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळते. असाच एक प्रकार पुन्हा बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये अजित पवारांनी नेते आणि कार्यकर्त्यांना झापलं आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे आहे. त्यामुळे आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अजित पवार बीडमध्ये ध्वजारोहणासाठी आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेकांची निवेदने स्वीकारली. यावेळी बीडचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते योगेश क्षीरसागर यांना तुम्ही तर काही काम करत नाही... म्हणून तर मला इथे... असे म्हणत अजित पवार यांनी त्यांना झापले आहे.
अजित पवारांनी सुनावले खडेबोल आज बीडमध्ये असताना अजित पवारांकडे एक समर्थक अर्ज घेऊन आला. यावेळी अजित पवारांनी तो अर्ज घेताच समर्थक काहीतरी बोलू लागला. यानंतर एक मिनिट... ऐकायला शिक... कागद दिलाय ना... आमचे तीन पक्षाचे सरकार आहे. महामंडळ वाटप अजून झालेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कोणती महामंडळ मिळतील हे ठरेल. त्यामुळे आमच्याकडे महामंडळ आले तर विचार करु, नाहीतर ज्यांच्या वाट्याला आले त्यांना जाऊन भेटा, असं म्हणत सराफा असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश लोळगे यांना अजित पवारांनी चांगलेच सुनावले आहे.
बीडमधील गुंडांनाही झापलं बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन अजित पवारांनी बीडकरांना केलं आहे. तर दुसरीकडे त्यांच्या स्टाईलने गुन्हेगारांना, आरोपींना, बीडमधील गुंडाना त्यांनी झापलं आहे.