Maruti Chitampalli: पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
सोलापूर: 'निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला,' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'मारुती चितमपल्ली सरांनी आपले संपूर्ण आयुष्य वन, प्राणी, पक्षी आणि निसर्गाच्या गूढ अभ्यासासाठी समर्पित केले. वृक्ष, पाने, फुलं, पक्षी, प्राणी, डोंगर अशा निसर्गातील असंख्य घटकांची माहिती असलेला ते एक चालताबोलता विश्वकोश होते. त्यांच्या लेखनातून मराठी साहित्यात निसर्गाविषयी संवेदनशील जाण निर्माण झाली. त्यांनी मराठी शब्दसंपदेत अनेक नवे शब्द, संकल्पना आणि अनुभवांची भर घातली.' हेही वाचा: मिरजमध्ये 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू; राज्यात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
'वनविभागात तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावत असताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांतून ही अभयारण्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आदर्श ठरली.'
'पक्षीशास्त्र आणि वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्रात त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली.'
'30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा गौरव त्यांच्या संपूर्ण कार्याचा योग्य सन्मान होता. मात्र त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले, ही बाब अधिकच वेदनादायक आहे.'
मारुती चितमपल्ली यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.