Amol Mitkari: 'माझी वैयक्तिक भूमिका...', अजित पवारांच्या व्हायरल कॉलवर अमोल मिटकरींची दिलगिरी
मुंबई: सोलापूर जिल्ह्यातील आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबत बोलतानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अजित पवार या व्हिडिओमध्ये संबंधित महिला पोलीस अधिकारीला खडसावत होते. या व्हायरल व्हिडीओवरुन अजित पवारांवर सर्वस्तरातून टीका होत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी थेट महिला अधिकारीच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत संशय व्यक्त केला. मात्र अजित पवार यांनी समाज माध्यमावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता मिटकरींनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी? आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची वागणूक अयोग्य असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी केली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री माहिती नसतील तर त्यांच्या शिक्षणावर संशय येत आहे. अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी आणि तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी पत्राद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोगाला केल्याचं त्यांनी म्हटले होते. यामुळे मिटकरी यांच्यावरही टीका झाली. परंतु अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर मिटकरींनीही घेतलेली भूमिका पक्षाची नसून माझी वैयक्तिक असल्याचं म्हटलं आहे.
सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं ट्वीट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो.ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती .आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला खूप आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.