मरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक महत्वाची

Amravati News: तरुणीच्या पोटातून 10 किलोची गाठ काढली; डॉक्टरांनी दिलं जीवनदान

सुरेंद्र आकोडे. प्रतिनिधी. अमरावती: अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक महत्वाची शस्त्रक्रिया पार पडली. पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे. ही गुंतागुंतीची आणि अवघड शस्त्रक्रिया कॅन्सर तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

हेही वाचा: Jalna DYSP : जालन्यात पोलिसांची मुजोरी, अधिकाऱ्याने आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली

पीडितांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

'मागील 4 वर्षांपासून संबंधित तरुणीला पोटदुखी आणि पोट फुगण्याचा त्रास होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करूनही काही फरक पडत नव्हता. दुर्दैवाने, तीन वर्षांपासून तिची मासिक पाळी देखील बंद झाली होती. त्यामुळे, तिचे कुटुंब अधिक चिंतेत होते. यादरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांना अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला मिळाला. तपासणीदरम्यान, तरुणीच्या पोटात गाठीसारखा मोठा गोळा असल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा, डॉक्टरांच्या पथकाने ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल 10 किलोचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे तरुणीला नवजीवन मिळाले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे', अशी प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली. 

पोटाचा घेर वाढल्याने मुलीची प्रकृती खालावली होती. यादरम्यान, तिला चालणे किंवा हालचाल करणे अवघड झाले होते. यामुळे, तिच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तिच्या वेदनेत दिवसंदिवस वाढ होऊ लागली. पीडित तरुणीच्या डाव्या अंडाशयात मोठी गाठ असल्याचं निदान झाल्यानंतर कॅन्सर तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के यांच्या नेतृत्वात पीडित तरुणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान, मूत्राशय आणि आतड्यांवर झालेला दबाव कमी करत ट्यूमर संपूर्णपणे काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला आवश्यक उपचार सुरू आहेत. डॉ. भावना सोनटक्के या जिल्ह्यातील एकमेव महिला कॅन्सर तज्ज्ञ असून, त्यांनी या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.