संभाजीनगरमध्ये एटीएम कार्डाची अदलाबदल करून वृद्धां

संभाजीनगरमध्ये एटीएम कार्ड बदलून लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांकडून पाच जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर: शहरातील नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना लक्ष्य करून एटीएम कार्डाची अदलाबदल करून लूट करणाऱ्या टोळीचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने विशेषतः वृद्ध नागरिकांना लक्ष्य केले होते.

पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये एक महिला, दोन सख्खे भाऊ आणि हरियाणातील दोघांचा समावेश आहे. आरोपींची नावे शबाना हारून खान (42, रा. एकतानगर, हसूल), नसिम खान कल्लू खान (29, रा. हरियाणा), इरफान रज्जाक शेख (36, रा. मिसारवाडी), समीर रज्जाक शेख (21, रा. मिसारवाडी), तौफिक फारूख खान (33, रा. हरियाणा). पोलिसांनी त्यांच्या जवळून 94 एटीएम कार्ड, 5 मोबाईल फोन आणि एक दुचाकी जप्त केली आहे.

कशी करत होते फसवणूक? टोळीची सूत्रधार शबाना खान ही वृद्ध नागरिकांचे लक्ष्य करत होती. ती एटीएममध्ये किंवा जवळपास वृद्धांना मदतीचा बहाणा करत, त्यांचे लक्ष विचलित करून त्यांचे मूळ कार्ड चोरायची किंवा हुबेहूब दिसणारे दुसरे कार्ड त्यांच्याजवळ ठेवायची. त्यानंतर टोळीतील इतर सदस्य विविध एटीएम मशीनमधून रक्कम काढून घेत. काही वेळातच हे आरोपी रिक्षाने घटनास्थळावरून पळून जात. हेही वाचा:भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयांच्या छतांमधून पाणी गळती; गरोदर महिलांसाठी धोक्याची घंटा

हरियाणातून आले होते शहरात लुटीच्या उद्देशाने टोळीत सामील असलेले नसिम खान व तौफिक खान हे दोघे हरियाणातून आले होते. त्यांनी शहरात आल्यापासून अनेक ठिकाणी लुटीचे प्रकार केले असून, त्यांच्या विरोधात इतर राज्यांमध्येही गुन्ह्यांची नोंद असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांचा सतर्क कारवायांनी उघड झालेली टोळी सिडको पोलिसांनी मंगळवारी कॅनॉट परिसरात केलेल्या कारवाईत या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर ही योजना आखून पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना अटक केली. हेही वाचा: डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील उपकुलसचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न

नागरिकांना इशारा; सावधगिरी बाळगा पोलीस विभागाने शहरातील सर्व नागरिकांना सूचना दिली आहे की, एटीएममध्ये पैसे काढताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या मदतीस नकार द्यावा. आपले कार्ड आणि पिन कुणासोबतही शेअर करू नये. एटीएममध्ये एकट्यानेच व्यवहार करावा आणि शंका आल्यास लगेच पोलिसांना माहिती द्यावी.