नागपुरात बांगलादेशी विमानाचे आपत्कालीन लँडिंग; तांत्रिक अडचणींमुळे घेण्यात आला निर्णय
Bangladesh Plane Makes Emergency Landing In Nagpur: बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बांगलादेशी विमानात धूर दिसल्यानंतर ते नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. हे विमान बांगलादेशची राजधानी ढाका येथून दुबईसाठी उड्डाण करत होते. विमानातून धूर निघत असल्याने त्याचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
नागपूर विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 10:45 वाजता तांत्रिक अडचणींमुळे बांगलादेशी विमानाला वळवण्यात आले. विमान आपत्कालीन परिस्थितीत नागपूर विमानतळावर उतरवावे लागले. विमान अधिकाऱ्याने सांगितले की, सखोल तपासणीनंतर असे आढळून आले की, विमानात आगीची कोणतीही घटना घडली नाही.
हेही वाचा - दिल्लीत विरोधी पक्षनेता कोण असेल? अतिशी यांना मिळू शकते का संधी? वाचा सविस्तर वृत्त
बांगलादेशी विमानात फायर अलार्म वाजला आणि त्यानंतर पायलट सावध झाला. पायलटने विमानतळ ऑपरेशन कंट्रोल सेंटरला माहिती दिली आणि सिस्टम ऑपरेशन कमांड सेंटरलाही सतर्क केले. यानंतर, विमान नागपूरकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. संपूर्ण आपत्कालीन परिस्थीती जाहीर झाल्यानंतर, विमान नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले.
हेही वाचा - रेखा गुप्ता यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार; पहिली मंत्रिमंडळ बैठक संध्याकाळी 7 वाजता होणार
दरम्यान, ढाकाहून दुबईला जाणाऱ्या विमानात 396 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर विमानात ठेवलेले सामान उतरवण्यात आले. नंतर, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विमानाची तपासणी केली. परंतु आगीची कोणतीही घटना आढळली नाही. प्रवाशांना दुसऱ्या विमान बांगलादेश विमानाने दुबईला नेण्यात येणार आहे.