Bhandara: रोपवनातील 26 हजार रोपटी वन्यप्राण्यांनी केली नष्ट; सामाजिक वनीकरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, वनमंत्र्यांकडे केली तक्रार
भंडारा: शासनाच्या सामाजिक वनीकरण कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकेत रोपे लावण्यात आली होती. त्यांचे योग्य संगोपन केले नाही. त्यामुळे ती उगविण्याऐवजी वन्यप्राण्यांच्या खाद्यसाखळीत हरवली आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील रोपवाटिकेत ही रोपे लावली होती. रोपवाटिकेतील एकूण 50 हजार लहान रोपांपैकी तब्बल 26 हजार 281 लहान रोपटी वन्यप्राण्यांनी नष्ट केली असल्याचा धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख अमित मेश्राम यांनी तक्रार केली आहे.
तुमसर तालुक्यातील डोंगरला परिसरात सामाजिक वनीकरण विभागाची रोप वाटिका आहे. याचं वाटीकेत 50 हजार झाडांची रोपे लावण्यात आली होती पण त्यापैकी 26 हजार झाडे वन्य प्राण्यांनी नष्ट केल्याचा धक्कादायक अहवाल अधिकाऱ्यांनी दिला आहे. 'शासन आपल्या दारी' व 'एक पेड माँ के नाम' असे उपक्रम शासनातर्फे राबविण्यात येत असले, तरी हिरव्यागार पर्यावरणासाठी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे तितकेच गरजेचे आहे. नाहीतर केवळ कागदोपत्रीच येथे झाडे लागल्याशिवाय राहणार नाहीत. या संपूर्ण प्रकरणामुळे तुमसर सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हजारो रोपटी नष्ट झाल्यानंतर देखील कुठलीही तातडीची कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
26 हजार झाडांची येथे अधिकाऱ्यांनी हत्या केली आहे. त्याबाबत अद्याप कारवाई झाली नाही. येथे वन्य प्राण्यांनी रोपटे नष्ट केली परंतु मौका चौकशी केली असता 26 हजार प्लास्टिकच्या पिशव्या रोपवाटिकेत आढळल्या नाहीत. येथे वन्य प्राण्यांनी झाडे खाल्ली तसेच त्यासोबतच प्लास्टिकच्या पिशव्या खाल्ल्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं विभागीय वनाधिकारी लक्ष्मण आवारे यांनी सांगितलं आहे.