Manoj Jarange Patil Big news : मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करणार; या 3 मुख्य अटींसह सशर्त परवानगी
मुंबई : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला अखेर परवानगी मिळाली आहे. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजातील बांधवांसह आंदोलन करणार आहेत. उच्च न्यायालयाने मंगळवारी असे स्पष्ट केले होते की, अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय जरांगे-पाटील निदर्शने करू शकणार नाहीत. मात्र, जरांगे-पाटील त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते. आता त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई यांच्याकडून आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. मात्र, या परवानगीच्या पत्रात काही अटी घालण्यात आल्या आहेत.
मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्यांनी ही परवानगी मागितली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई यांनी दिलेल्या परवानगी पत्रात, आंदोलनासाठी काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.
मुख्य अटी आणि शर्ती: - आंदोलनाचे स्थळ आणि वेळ: आझाद मैदानातील राखीव जागेतच हे आंदोलन करायचे आहे. याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 अशी असेल. या वेळेनंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही. - आंदोलक संख्या: आंदोलकांची कमाल संख्या 5,000 पर्यंत मर्यादित असेल. मैदानाचा राखीव भाग केवळ 7,000 चौरस मीटर असून, तो 5,000 आंदोलकांना सामावून घेण्यासाठी पुरेसा आहे. - वाहतूक आणि वाहने: आंदोलकांची वाहने मुंबईत प्रवेश केल्यावर ईस्टर्न फ्री वे मार्गे वाडीबंदर जंक्शनपर्यंत येतील. आंदोलकांच्या मुख्य नेत्यांसोबत फक्त 5 वाहने आझाद मैदानापर्यंत जातील. इतर वाहने पोलिसांच्या निर्देशानुसार शिवडी, ए-शेड आणि कॉटनग्रीन परिसरात पार्क करावी लागतील. गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इतर नियम: - आंदोलनाला एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी दिली जाईल. - शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगी दिली जाणार नाही. - परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक किंवा गोंगाट करणाऱ्या उपकरणांचा वापर करता येणार नाही. - आंदोलनादरम्यान अन्न शिजवण्यास किंवा कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. - आंदोलनात लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि वृद्ध व्यक्तींना सहभागी करू नये, असेही पत्रात नमूद आहे.
हेही वाचा - Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटीलांची मुंबईकडे कूच , कसा असणार प्रवास ?