संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठी अपडेट; देशमुखांच्या हत्येची आरोपींकडून कबुली
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बीड जिल्ह्यात गाजलेल्या या प्रकरणात मुख्य आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. वाल्मिक कराड गँगशी संबंधित तीन आरोपींनी पोलिसांसमोर कबुली देत खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणामुळे बीडच्या गुन्हेगारी विश्वात मोठी चर्चा रंगली आहे.
सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी पोलिसी चौकशीत संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली दिली. विशेष म्हणजे, सुरुवातीला सुदर्शन घुलेने आपल्या सहभागाचा इन्कार केला होता. मात्र, पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडीओ दाखवला. त्यानंतर घुलेचा खेळ संपला आणि त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 'होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला,' अशी स्पष्ट कबुली त्याने दिली.
हेही वाचा: 'गद्दार' गाणाऱ्या कुणाल कामराला जागतिक पाठिंबा – दोन दिवसांत 4 कोटींची मदत!
संतोष देशमुख यांनी एकदा आवादा कंपनीच्या परिसरात आरोपींना मारहाण केली होती. त्या घटनेचा राग आरोपींच्या मनात होता. एवढेच नाही, तर खंडणीसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये देशमुख अडथळा ठरत होते. त्यामुळे 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही दुसरी बैठक झाली. या बैठकीत संतोष देशमुख यांची हत्या करण्याचा कट रचल्याचे चौकशीत उघड झाले. महेश केदार याने तर हत्या करतानाचा व्हिडीओ शूट केल्याचेही कबूल केले आहे.
या खटल्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद करत एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयात सादर केला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेल्या कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना तीन वेळा फोन केल्याचे सीडीआर रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. हा पुरावा पोलिसांच्या आरोपपत्रात नव्हता, त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी मांडलेला हा सीडीआर रिपोर्ट गेमचेंजर ठरत असल्याचे मानले जात आहे.