सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुली ऑफर
Chandrakant Patil On MP Vishal Patil: सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'अपक्ष खासदार विशाल पाटील हे तरुण असून जिल्ह्यातील विकासासाठी त्यांनी भाजपासोबत यावे व विकास कामांना गती द्यावी. त्यांच्या अजून चार वर्ष दोन महिने असा मोठा कालावधी असून त्यांनी भाजप प्रवेश केल्यास मोठा फायदा होईल, असं मत चंद्रकांत पाटील यांनी आज सांगली येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
हेही वाचा - राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार?
चंद्रकांत पाटील यांच्या ऑफरला विशाल पाटील यांनी दिलं 'हे' उत्तर -
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या भाजपा प्रवेश ऑफरला उत्तर देताना खासदार विशाल पाटील म्हणाले की, मंत्री चंद्रकांत पाटील वयाने जेष्ठ आहेत. त्यांना माझे काम आवडत असेल. तथापि त्यांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी आभार मानतो. परंतु मी अपक्ष खासदार असल्याने मला कुठल्याही पक्षात जाता येत नाही.
गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या झालेल्या लढतीत सांगलीमध्ये अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेले विशाल पाटील यांच्या नावाची चांगली चर्चा झाली होती. सांगलीमध्ये तिरंगी म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत झाली होती. महाविकास आघाडी कडून लोकसभा निवडणुकी वेळी शिवसेनेने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची अगोदरच घोषणा केली होती.
हेही वाचा - भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली
तथापि, काँग्रेस कडून विश्वजीत कदम यांच्या पाठिंब्याने विशाल पाटील यांना उमेदवारी द्यायची होती. परंतु शिवसेनेने माघार न घेतल्यामुळे विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना लोकसभेला अपक्ष उभे करून पूर्ण पाठिंबा दिला होता. विशाल पाटील हे वसंत दादा पाटील यांचे वारस असल्याने त्यांना या निवडणुकीत सांगलीकरांनी स्वीकारले.