Chhtrapati Sambhajinagar Flood : नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचं पाणी, तूर, मका, टोमॅटो, सोयाबीन भुईसपाट; संदीपान भुमरेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: 'जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे, शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ पंचनामे सुरू करावे. तसेच, शेतकरी बांधांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी तालुकानिहाय 'तक्रार केंद्र' 24 तासांसाठी उभारण्यात यावे', अशी सूचना खासदार संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली.
यादरम्यान, खासदार संदिपान भुमरे यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, 'मागील तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. काही गावात तर ढगफुटीसदृश पाऊस आहे. नदीकिनारी असलेल्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने खरीप पिके, तूर, कापूस, कणीस, टोमॅटो, आणि सोयाबीन हे पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. त्यामुळे, शेतकरी बांधवांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, मात्र, सततच्या मुसळधार पावसामुळे त्यांची पिके उद्धवस्त झाली.
खासदार भुमरे यांनी नमुद केले की, 'जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे, अनेक गावांसोबतचा थेट संपर्कच तुटला. तसेच, ग्रामीण भागातील नद्यांवरील पुलांचे मोठे नुकसान झाले आहे आणि काही ठिकाणी तर पूलच वाहुन गेले आहेत'. महानगरपालिकेच्या नारेगाव परिसरातील सुखना नदीसह परिसरातील नदी आणि नाल्यांना पूर आला. त्यामुळे, वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अशातच, हवामान खात्याने असा संकेत दिला आहे की, पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शेतकरी बांधवांना आर्थिक झळ बसण्याची शक्यता आहे. तसेच, शेतकरी बांधवांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी 24 तास सुरू राहणारे तालुकानिहाय 'तक्रार केंद्र' उभारणे गरजेचे आहे, असं पत्र खासदार संदिपान भुमरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.