Chhtrapati Sambhajinagar: सिल्लोडच्या महिलांचा संताप; अस्वच्छतेविरोधात 'भीक मागो आंदोलन'
विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील भवन गावात दिवसेंदिवस अस्वच्छता वाढत असून, त्यामुळे आता रोगराईचा फैलाव होत आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि बंद गटारे यामुळे, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर परिस्थितीकडे सरपंच आणि सदस्य वारंवार दुर्लक्ष करत असल्याने ग्रामपंचायतीतील महिला उपसरपंचांनी आणि दोन सदस्यांनी 'भीक मागो आंदोलन' करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
हेही वाचा: 'ही' अभिनेत्री होती माधुरीची झेरॉक्स कॉपी; चक्क शाहरुखची फिल्म नाकारली
'गेल्या 3 महिन्यांपासून, भवन गावातील स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली घंटागाडी बंद आहे आणि कचरा उचलला जात नाही. त्यामुळे गावात दुर्गंधी पसरली आहे आणि डेंग्यू, ताप, उलटी-जुलाब यांसारख्या रोगांची लक्षणे आढळू लागली आहेत. याकडे सातत्याने लक्ष वेधूनही जबाबदार लोकप्रतिनिधी हालचाल करत नाही', असा आरोप महिला उपसरपंचांनी केला आहे. 'मारुती मंदिराजवळील नालीची अवस्था बिकट झाली आहे आणि वाहणाऱ्या घाण पाण्यामुळे आजुबाजूला रोगराईचा धोका वाढत आहे. मात्र, दुरुस्तीला निधीच नाही. त्यामुळे, आम्ही तिथल्या कामासाठीही गावकऱ्यांकडून भीक मागून निधी गोळा केले आहे', असं महिला उपसरपंच म्हणाल्या.
हेही वाचा: पुणेकरांसाठी खुशखबर! वाहतूक कोंडी सुटणार; 'या' ठिकाणी होणार मेगा टर्मिनल
'लोकप्रतिनिधी असूनही मी गावासाठी झोळी घेऊन रस्त्यावर उभी आहे, हे दुर्दैव नाही का?', असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. 'गाव वाचवण्यासाठी मी भीक मागत आहे', अशा आशयाचे पत्रक हातात धरून आणि झोळी घेऊन उपसरपंचांनी गावात फिरत आंदोलन केले. या दरम्यान, त्यांनी गावकऱ्यांसमोर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आवाज उठवला. ग्रामस्थांनी देखील या आंदोलनाला भरघोस पाठिंबा दर्शवला. ग्रा.सदस्य सुलोचना खाजेकर आणि ग्रा.स.गणेश खैरे म्हणाले, 'सार्वजनिक आरोग्य धोक्यात आहे. सरपंच आणि सदस्यांनी तात्काळ काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल'.