बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील भारतीय जनत

पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात सीआयडी चौकशी करा; आमदार संजय कुटेंची मागणी

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी आग्रहाची मागणी विधिमंडळाच्या माध्यमातून आज आमदार संजय कुटे यांनी शासनाकडे केली आहे.

पंकज देशमुख मृत्यू प्रकरण मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात गाजत आहे. भारतीय जनता पार्टी सोडून इतर सर्व पक्षांनी सीआयडी चौकशी करून या प्रकरणाची सत्यता समोर आणण्याची मागणी सुरु आहे. यासाठी अनेक आंदोलने ही झाली आहेत. भाजपकडून मात्र आतापर्यंत या प्रकरणात कुठलीच मागणी अथवा भूमिका स्पष्ट करण्यात आली नसल्याने विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला होता.

हेही वाचा: Latur; वृद्ध शेतकऱ्यानं स्वत:ला नांगराला जुंपलं

दरम्यान विविध आरोप सुद्धा करण्यात आले होते. यामध्ये आता भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी विधिमंडळामध्ये आज आपल्या लक्षवेधी भाषणामध्ये सांगितले की, पंकज देशमुख म्हणजे माझा अत्यंत जवळचा तसेच लहानपणापासून माझा सहकारी राहिला आहे, पंकजच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला असून त्याच्या मृत्यूची सीआयडीद्वारे चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पंकजचा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात आहे? असा संभ्रम कुटुंबियांमध्ये निर्माण झाला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी सीआयडी (CID), एसआयटी (SIT) आणि सीबीआय (CBI) किंवा न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून करण्यात यावी अशी मागणी आमदार संजय कुटे यांनी सभागृहाच्या माध्यमातून सरकारकडे आग्रही केली आहे.

नेमकं घडलं काय?  3 मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत व संशयास्पद परिस्थित आढळला होता. त्यावेळी त्याच्या हातावर, पायावर आणि मानेवर अनेक जखमा आढळल्या होत्या. त्यानंतर पत्नी सुनीता देशमुख यांनी जळगाव जामोद पोलिसांवर विश्वास नसल्याने पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. पंकज देशमुख गेल्या 22 वर्षांपासून भाजपा कार्यकर्ता होते. तसेच आमदार संजय कुटे यांचे वाहन चालक देखील होते.