गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी
पुणे : गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भांडणात बाकी विद्यार्थी देखील जखमी झाले आहेत. गरवारे महाविद्यालयासमोरील मॉलमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होते.
गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल पोहोचले. पोलीस उपायुक्तांनी घडलेल्या घटनेची चौकशी केली.
नेमकी विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी कशी झाली ?
गरवारे महाविद्यालयातील दोन गटांमध्ये तरुणीशी बोलण्यावरुन वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात 7 ते 8 जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये तरुणीशी संबंधित हा वाद आहे. गरवारे महाविद्यालयातील दोघे जण सेंट्रल मॉलजवळ उभे असताना 7 ते 8 जण तिथे आले होते. त्यांनी त्यातील एकाला चावीने मारले. त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले़. त्याच्याकडे दुचाकीची चावी नसल्याने तो तेथेच थांबून राहिला़ त्यामुळे या टोळक्यांमधील एकाने कोयता काढून त्याच्या डोक्यावर वार केले. त्याच्या मित्रावरही कोयत्याने वार केले. दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणाची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस रूग्णालयात दाखल झाले होते.