'परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत' या विधानावर दादा भुसेंचे स्पष्टीकरण
मुंबई: 'परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत' या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विधानावर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी हा निर्णय योग्य ठरू शकतो, मात्र 300 विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका एका दिवसात तपासणे शक्य नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
राज्यातील शाळांमध्ये परीक्षा तपासणीसाठी आधीच कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. परीक्षेच्या दिवशीच उत्तरपत्रिका तपासून निकाल लावण्याची सक्ती केल्यास शिक्षकांवर अनावश्यक ताण येईल. वेळेच्या मर्यादेमुळे उत्तरपत्रिकांचे अचूक मूल्यमापन करणे कठीण होईल, अशी तक्रार शिक्षक संघटनांनी केली आहे.
भुसे यांचे स्पष्टीकरण – आठ दिवसांची मुदत या निर्णयावर जय महाराष्ट्रवर प्रतिक्रिया देताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, 'शिक्षकांवर ताण येऊ नये म्हणून पेपर झालेल्या दिवसापासून पुढे आठ दिवसांच्या आत उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कालावधी दिला आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या हेतूने हा निर्णय घेतलेला नाही.' त्यांच्या मते, या नियमांमुळे निकाल प्रक्रियेत गती येईल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.
हेही वाचा: परीक्षेत कडक तपासणीमुळे शिक्षकांचा आक्रोश!
शिक्षक संघटनांच्या मते, मोठ्या पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये ही अंमलबजावणी करणे अवघड आहे. परीक्षा संपल्यानंतर लगेचच तपासणी करावी लागल्यास शिक्षकांना तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे हा निर्णय वास्तवाला धरून नसून पुनर्विचार होणे गरजेचे आहे, अशी मागणी शिक्षक करत आहेत.