अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा! मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा! मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर तब्बल 82 दिवसांनी अखेर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याची प्रत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारत त्याची अधिकृत घोषणा विधानसभेत केली. तसेच त्यांनी मुंड यांचा राजीनामा राज्यपालाकडं पुढील कारवाईसाठी पाठवल्याचे देखील सांगितले.  

9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे मुंडे यांच्यावर नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, असा विरोधकांचा आग्रह होता.

गेल्या काही आठवड्यांपासून हत्याकांडाच्या तपासाची नवी माहिती समोर येत होती. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. या फोटोंमुळे जनतेच्या रोषाला अधिक धार आली आणि राजीनाम्याची मागणी तीव्र झाली.

हेही वाचा - औरंगजेबाच्या समर्थनावर अबू आझमी विरोधात ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल ?

मुंडे यांच्या राजीनाम्याची नाट्यमय घडामोड

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतरच राजकीय वर्तुळात मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला.

आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा थेट मुख्यमंत्र्यांकडे न देता, आपल्या पीएच्या मार्फत सागर बंगल्यावर पाठवला. त्याच वेळी मुख्यमंत्री विधानभवनाकडे रवाना झाले होते. काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारल्याची घोषणा केली आणि पुढील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवला.

हेही वाचा - येवल्यात दिव्यांग बांधवांकरिता मोटार चलित ट्रायसायकलचे वाटप