संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे आरोपी झालेच पाहिजे; जरांगे पाटलांची मागणी
विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी मुंबई आणि परळी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्यामुळे प्रकरणात सामूहिक कटात सहभागी म्हणून धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं पाहिजे. त्याचबरोबर या प्रकरणात आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं. त्यांनाही सहआरोपी का केलं नाही? असा सवालही जरांगे यांनी केला आहे. धनंजय मुंडेंना या प्रकरणात आरोपी करत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
सत्य कधीच झाकत नाही, तुम्ही किती प्रयत्न केले तरी नियतीला मान्य नसते. त्या लोकांनी कोणासाठी केले तर ते धनंजय मुंडे यांच्यासाठीच. धनंजय मुंडे यांची ही संघटित गुन्हेगारी आहे, कुठे खंडणी वसूल करायची, हा पैसा धनंजय मुंडेंना दिला जायचा. हत्याप्रकरणातील एक नंबरचा आरोपी टोळी तयार करून अशी कृती करत होता. एक नंबरच्या आरोपीनेचं खंडणीसाठी खून करायला लावल्याचे सिद्ध झाले. धनंजय मुंडेनेचं मोर्चे काढायला लावले, रास्ता रोको आंदोलन करायला लावले. माझा संबंध नसताना माझ्या फोटोला धनंजय मुंडेनीच चपला हाणायला लावल्या. तुम्ही अशी कितीही कृती केली तरी नियतीला मान्य नसते. तुम्हाला याचे फळ मिळाले, माझ्या नादी लागू नका, इथून पुढे माझ्या नादी लागल्यास मी सोडणार नसल्याचे मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा : देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; धनंजय देशमुखांची मागणी
अजित पवार म्हणतात पुरावे पाहिजे, कराड तो खंडणी गोळा करतो, खुन करून लोकांच्या जमिनी लुटतो, तो धनंजय मुंडे लाच देतो हे पुरावेच आहेत. धनंजय मुंडेचे लोक आरोपींना गाडीत घेऊन फिरतात. ते सहआरोपी कसे नाही झाले? सरकारने धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाचवायला नको होतं. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. त्यामुळे 302 मध्ये धनंजय मुंडे आरोपी होतात आणि झालेच पाहिजे. गृहमंत्र्यांनी ते करावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.