छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या
धाराशिव: बीड येथे शिक्षण घेत असलेल्या आणि मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील असलेल्या साक्षी कांबळे या महाविद्यालयीन तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एक महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज, 20 एप्रिल रोजी तिचा विवाह होणार होता, मात्र त्या आधीच तिने आयुष्य संपवले. या धक्कादायक घटनेनंतरही अद्याप पीडितेला न्याय मिळालेला नाही, यामुळे साक्षीच्या आईने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे.
साक्षी कांबळे ही तरुणी धाराशिव येथील तिच्या मामाच्या घरी राहात होती. बीडमध्ये उच्चशिक्षण घेत असताना काही युवकांनी तिला सतत त्रास दिला. छेडछाड, मानसिक त्रास, आणि सतत ब्लॅकमेलिंग यामुळे ती तणावात होती. यातूनच तिने एक महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जरी एका महिन्यापूर्वी घडली असली, तरी आजही तिच्या मृत्यूनंतर न्याय मिळालेला नाही.
हेही वाचा : 8 मे रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद
साक्षीच्या आई कोयना विटेकर यांनी लिहिलेल्या पत्रात अत्यंत भावनिक शब्दांत आपली व्यथा मांडली आहे. माझ्या साक्षीने फार स्वप्नं पाहिली होती. आज तिचा लग्न ठरलेला दिवस होता. पण माझ्या डोळ्यासमोर माझी फुलासारखी मुलगी फासावर लटकलेली दिसते. एक आई म्हणून मी तुटले आहे. पण आता मी लढायचं ठरवलं आहे,असे त्या पत्रात नमूद करते. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट कारवाई करण्याची विनंती केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत लढा देणार असल्याचे त्या म्हणाल्या. हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, जनमानसातूनही सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
साक्षीच्या कुटुंबियांनी धाराशिव पोलिसांवरही निष्क्रियतेचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून सहकार्य न मिळाल्यामुळेच आरोपीला लवकरच जामीन मिळाला. अभिषेक कदम नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असली, तरी त्याची लवकरच जामिनावर सुटका झाली. यामुळे पीडित कुटुंब अधिकच हताश झाले आहे. माझ्या मुलीबरोबर जे घडलं, ते इतर कुठल्याही मुलीच्या बाबतीत होऊ नये. म्हणूनच या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी स्पष्ट मागणी साक्षीच्या आईने केली आहे.
साक्षीच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींवर होणारी छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज या घटनेतून अधोरेखित होते. साक्षीच्या आत्महत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असून, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार तिच्या कुटुंबाने केला आहे. आता शासन आणि पोलिस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोपींवर कठोर कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.