बीडमध्ये काम करायला पोलिसांची नकारघंटा
बीड: मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्यांवरून बीड जिल्हा चर्चेत आला. तसेच काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सामाजिक, राजकीय नेत्यांनी आरोप केले. त्यामुळेच की काय आता बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांनी नकारघंटा दर्शवली. बीड नको, दुसरीकडे बदली करा, असे विनंती अर्ज जिल्ह्यातील 172 पैकी 107 अधिकाऱ्यांनी महासंचालक व विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे केले आहेत.
यात 29 पैकी 15 ठाणेदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यात 29 पोलिस ठाणे आहेत. यामध्ये उपनिरीक्षक ते डीवायएसपी अशा 188अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून पैकी 172 सध्या कार्यरत आहेत. 30 लाख लोकांच्या सुरक्षेसाठी हे मनुष्यबळ अगोदरच कमी आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, अंजली दमानिया, आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळेच जिल्ह्यातील अधिकारी आता बीड नको म्हणून विनंती अर्ज करून बदली मागत आहेत. 17 फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज मागविले होते. त्याचा आकडा 107 आहे.
हेही वाचा: वजन वाढण्यासाठी वापरा 'ह्या' ट्रिक
कारण काय ? मस्साजोग हत्या प्रकरणाने झालेले गंभीर आरोप. पोलिसांबद्दल अविश्वास, बंद झालेले अवैध धंदे, राजकीय लोकांचा हस्तक्षेप, पोलिस अधीक्षकांकडून काम करण्यासाठीचा दम अशी विविध कारणे या मागची असू शकतात; परंतु अर्जामध्ये वैयक्तिक, आजारपण, गैरसोय अशी कारणे आहेत.
दरम्यान 'बीडला ड्युटी नकोच' असं पोलिसांचं म्हणणं असून 107 पोलीस अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज केलेत त्याचबरोबर 172 पैकी 107 अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज केलेत. संतोष देशमुख हत्येनंतर बीडमध्ये वातावरण तापलं असल्याचं पाहायला मिळतंय यामुळेच बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांनी नकारघंटा दर्शवलीय.