मांसविक्री बंदीच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, म्हणाले, 'कुणी काय खावं, हे...'
मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मांसविक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, महापालिकेच्या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी या मुद्द्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली होती. अशातच, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांसविक्रीवर बंदीवर वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
'कल्याण-डोंबिवली महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाची मलाही माहिती नव्हती. ही माहिती मला माध्यमांद्वारे मिळाली. या निर्णयाबद्दल जेव्हा मी इतर महानगरपालिकांना विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की, महाराष्ट्रात हा निर्णय 1988 पासून हा निर्णय लागू करण्यात आले होते. त्यामुळे, दरवर्षी आम्ही हा निर्णय घेत आहोत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मला मांस बंदीच्या निर्णयाची प्रत पाठवली होती. कोणी काय खावं? काय खाऊ नये? यात सरकारला जराही रस नाही. आमच्याकडे इतरही प्रश्न आहेत. त्यामुळे, मला असं वाटतं की, 1988 मध्ये घेतलेल्या निर्णयावर काही कारण नसताना वाद आणि गैरसमज निर्माण करणे याला काहीच अर्थ नाही. काही लोक तर अक्षरक्ष: शाकाहारी लोकांना नपुंसक म्हणू लागलेत. हा मूर्खपणा बंद केला पाहिजे. हा निर्णय जुन्या सरकारने घेतला आहे. आमच्या सरकारने हा निर्णय नाही घेतला', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
हेही वाचा: '...तर सरकारी बंगला सोडेन'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
'ठाणेमध्ये आल्यावर मला कळालं की कल्याण डोंबिवलीत एका आयुक्ताने अशी ऑर्डर काढली की, 15 तारखेला मांसविक्री करू नये. त्यांच्या बापाचं राज्य आहे का? काय चालू आहे? आता लोकांनी काय खावं आणि दुकानदारांनी काय विकावं याला कायद्याने काही बंदी आहे का? हा काय तमाशा आहे? किती द्वेषाची भावना पसरवायची आहे तुम्हाला?', असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'आम्ही काय खावं आणि कोणत्या दुकानात जावं तेही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी. या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यादिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहात का? हा काय तमाशा आहे?'.
'हे' आहे महापालिकेचे आदेश
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने असा आदेश दिला की, 15 ऑगस्ट रोजी मांसाची दुकाने बंद ठेवण्यात यावे. यासह, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने एका अधिसूचनेत असे म्हटले की, '14 ऑगस्टच्या रात्रीपासून ते 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कत्तलखाने बंद राहतील'.