अंगणवाडीत मुलांच्या जीवाशी खेळ; वैजापूरच्या एकोडीसागजमध्ये निकृष्ट पोषण आहाराचा प्रकार उघड
छत्रपती संभाजीनगर: शासनाच्या अंगणवाडी पोषण आहार योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील बालकांना पोषक आहार पुरवून त्यांचे आरोग्य सुधारण्याचा आहे. मात्र वैजापूर तालुक्यातील एकोडीसागज येथील घटनेने या योजनेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. येथील अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात आलेले पोषण आहाराचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असून, त्यात मुदतबाह्य वस्तूंचाही समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
एकोडीसागज येथील ग्रामस्थांनी, सरपंच व उपसरपंच यांच्या पुढाकाराने हे संपूर्ण साहित्य एकत्र करून थेट वैजापूर पंचायत समितीच्या दारात टेम्पोत आणून ठेवले. ग्रामस्थांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदार व पुरवठादारावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.या साहित्यातील अन्नधान्य निकृष्ट असल्याने ते वापरण्यात आले नाही की वापरानंतर त्रास झाल्याने मुद्दा पुढे आला, याबाबत मात्र अद्याप प्रशासनाने खुलासा केलेला नाही. मात्र, हे प्रकरण ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे प्रकाशझोतात आले आहे. हेही वाचा: भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीत UPI चे ऐतिहासिक यश; कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे दमदार वाटचाल
पोषण आहारासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. तरीदेखील वेळोवेळी अशा घटना समोर येत असल्याने संबंधित यंत्रणांची कार्यपद्धती आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या आरोग्याशी असा खेळ मांडला जाणे ही केवळ हलगर्जीपणा नाही, तर गंभीर गुन्हा आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याआधी मुंबईमध्ये एका आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवण दिल्याने कँटीनच्या कारागिराला फटके दिल्याची घटना ताजी असतानाच, ग्रामीण भागातील प्रशासन व ठेकेदार किती बेफिकीर आहेत, हे या प्रकारातून दिसून येते.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच येथील अंगणवाडीत भविष्यात चिमुकल्यांच्या जीवाशी असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे केली आहे.
दरम्यान, पंचायत समितीचे अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतात का आणि दोषींवर कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण वैजापूर तालुक्याचे लक्ष लागून आहे.
शासनाच्या पोषण आहार योजनेचा खरा लाभ गरजू बालकांपर्यंत पोहोचावा, यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी व योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे, असे आवाज आता गावोगाव उमटू लागले आहेत.