Engine Failure Of Goods Train: मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; ऐन गर्दीत मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत
Engine Failure Of Goods Train: मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे सेवा आज सकाळपासून विस्कळीत झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या आधीच मोठ्या प्रमाणावर वाढली असताना, टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत आहेत. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत असून, स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मालगाडीच्या इंजिनमध्ये आलेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या सेवांवर थेट परिणाम झाला. यामुळे अप व डाउन दोन्ही मार्गांवरील वाहतुकीत व्यत्यय आला. रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, इंजिन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ट्रॅव्हल अॅप एम-इंडिकेटरनुसार, ठाणे दरम्यान धावणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
दरम्यान, कसारा ते कल्याणला जोडणाऱ्या मार्गावरील लोकल गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या आहेत. कल्याण–सीएसएमटी मार्गावरील अप व डाउन दोन्ही सेवांवर याचा परिणाम झाला असून, प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे. तथापी, कल्याण, डोंबिवली, ठाणे या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'बिघाड झालेल्या इंजिनची दुरुस्ती करण्यासाठी तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. शक्य तितक्या लवकर नियमित सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'
काही दिवसांपूर्वी ठाण्याजवळील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातात गर्दीने भरलेल्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने सुरक्षा उपाय मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची प्रणाली नवीन व विद्यमान गाड्यांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.