ऑफिस मिटिंगदरम्यान टोकाचा निर्णय! 7 व्या मजल्यावरून उडी मारून 23 वर्षीय अभियंत्याने संपवले जीवन
पुणे: सोमवारी सकाळी हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या 23 वर्षीय अभियंत्याने ऑफिसच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मृत अभियंत्याचे नाव पियुष अशोक कवडे असे आहे. पियुष नाशिक येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 10:30 वाजता अॅटलास कॉप्को या कंपनीच्या इमारतीत घडली. पियुष एका मिटिंगमध्ये सहभागी असताना त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर तो अचानक सातव्या मजल्यावर गेला. त्यानंतर त्याने इमारतीवरून उडी मारली.
घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये पियुषने लिहिले, 'मी आयुष्यात सर्वत्र अपयशी ठरलो आहे. मला माफ करा.' तसेच त्याने आपल्या वडिलांसाठी भावनिक संदेश लिहून स्वतःबद्दल अपराधी भावना व्यक्त केली आहे. मात्र, पियुषने आपल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी कोणत्याही कामाच्या ताणतणावाचा थेट उल्लेख केलेला नाही.
हेही वाचा - डिश रिपेअरच्या निमित्ताने आले अन्... अल्पवयीन मुलांनी केली 80 वर्षीय वृद्धेची हत्या
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पंद्रे यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू आहे. याप्रकरणी कामाच्या ठिकाणी व कुटुंबाकडून अधिक माहिती घेतली जात आहे. गेल्या काही महिन्यांतील पुण्यातील व्यावसायिकाची ही तिसरी आत्महत्या आहे. जूनमध्ये एका 28 वर्षीय डॉक्टरने, तर मे महिन्यात 25 वर्षीय आयटी व्यावसायिक युवतीने अशाच पद्धतीने आत्महत्या केली होती.
हेही वाचा - 'पोलिसांनी चौकशीसाठी...; शनि मंदिराचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी संपवलं जीवन
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 / 1800 891 4416 अर्पिता हेल्पलाइन: 080-23655557 iCall (TISS): 022-25521111 / 9152987821 वांद्रेवाला फाउंडेशन: 9999 666 555