Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; बसच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात 19 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून तिचा धाकटा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणीची ओळख देवयानी किशोर गोळे अशी झाली असून ती पनवेलमधील महाविद्यालयात बीएमएसच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. देवयानी आपल्या भावासोबत स्कूटरवरून रोहाजवळील मामाच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.
रायगड जिल्ह्यातील रोहा, नम्रता धाब्याजवळ खेड डेपोकडून वेगाने आणि बेपरवाईने येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात देवयानीचा जागीच मृत्यू झाला. तसेच तिचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर कोलाड पोलिसांनी एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू, अविचारीपणे वाहन चालवणे आणि मानवी जीवनाला धोका निर्माण करणे या कलमांनुसार तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.