एका म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतल

नांदेडमध्ये म्हशीच्या मृत्यूचा अख्ख्या गावाला धसका! रेबीजची लस घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बिल्लाली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. एका म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर म्हशी आजारी पडली आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूपूर्वी त्या म्हशीचे दूध गावातील अनेक घरांमध्ये वापरण्यात आले होते. गावीतील अनेकांनी या दुधाचे सेवन केले होते.  

मिळालेल्या माहितीनुसार, बिल्लाली येथील रहिवासी किशन इंगळे यांच्या म्हशीला अज्ञात कुत्र्याने काही दिवसांपूर्वी चावा घेतला होता. सुरुवातीला या घटनेकडे दुर्लक्ष झाले, मात्र काही दिवसांनी म्हशीची तब्येत बिघडू लागली. उपचाराआधीच गेल्या आठवड्यात म्हशीचा मृत्यू झाला. म्हशीच्या मृत्यूचे कारण कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजचा संसर्ग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - कुत्रा चावलाय? सुरुवातीच्या 20 मिनिटांत करा ''हे'' काम; संसर्गाचा धोका 99 टक्क्यांनी होईल कमी

दरम्यान, म्हशी जिवंत असताना तिचे दूध गावातील सुमारे 180 लोकांच्या घरी गेले होते. म्हशीच्या मृत्यूनंतर ही माहिती पसरताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन गावातील आणि आसपासच्या 182 लोकांनी खबरदारी म्हणून रुग्णालयात जाऊन रेबीज लसीकरण करून घेतले. या घटनेनंतर आरोग्य विभाग तात्काळ सतर्क झाला. विभागाचे पथक गावात दाखल झाले असून, संभाव्य रुग्णांची तपासणी, लसीकरण आणि जनजागृती केली जात आहे. तसेच लोकांना घाबरून न जाता तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - 11 वर्षीय मुलावर पिटबुलचा हल्ला; निर्दयी मालक फक्त मजा पाहत राहिला

रेबीज हा प्राणघातक आजार असून, तो मुख्यतः संक्रमित प्राण्याच्या चाव्यामुळे, ओरखड्यामुळे किंवा लाळेच्या संपर्कामुळे पसरतो. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दूध उकळले असले तरी काही परिस्थितीत विषाणूचा धोका राहू शकतो, त्यामुळे अशा घटना घडल्यास तातडीने लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असते.

बिल्लाली गावातील ही घटना ग्रामीण भागात पशु आरोग्याविषयी जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित करते. पशुधनाला झालेल्या जखमा किंवा चाव्याचे प्रकार त्वरित उपचाराविना राहिल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा घटनांबाबत त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधणे आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.