Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात कोकणात जाणार असाल तर इकडे लक्ष द्या; 23 ऑगस्टपासून वाहतुकीत होणार मोठे बदल
रायगड: गणेशोत्सव जवळ आल्यावर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात येतात. या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. '27 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. अशातच, कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर 16 टन आणि त्याहून अधिक वाजनाच्या वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.
23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 पासून ते 29 ऑगस्ट रोजी रात्री 12 पर्यंत आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पासून ते 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 पर्यंत, तसेच, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 8 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे', रायगडचे जिल्हाधिकारी किशन जाधव यांनी अशी माहिती दिली. नुकताच, रायगड जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, आदी उपस्थित होते.
महामार्गावर असणार 'या' सुविधा
गणेशभक्तांसाठी महामार्गावर सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. यात खालीलप्रमाणे सुविधा असतील:
पोलिस मदत केंद्र, आपत्कालीन पोलिस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहनदुरुस्ती कक्ष, टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा, वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार, बालक आहार कक्ष, मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस, महिलांसाठी फिडींग कक्ष, या सारख्या सुविधा महामार्गावर उभारण्यात येणार आहे.