Pune Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जनादरम्यान पुणे जिल्ह्यात 4 जण बुडाले; दोघांचा शोध सुरू
Pune Ganpati Visarjan 2025: पुणे जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठी दुर्घटना घडली. वेगवेगळ्या भागांत चार जण बुडाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित दोन जणांचा शोध घेण्यासाठी पोलिस, एनडीआरएफ व अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे.
पहिली घटना वाकी बुद्रुक (प्रियदर्शन शाळेजवळ) येथे घडली. कोयाली गावातील अभिषेक संजय भाकरे (21) आणि उत्तर प्रदेशातील आनंद जयस्वाल (28) हे दोघेही विसर्जनादरम्यान भीमा नदीत वाहून गेले. यामध्ये आनंद जयस्वालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अभिषेक भाकरेचा शोध सुरू आहे. प्रशासन, पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके सतत शोधमोहिम राबवत आहेत.
दुसरी घटना खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडली. विसर्जनावेळी 45 वर्षीय रवींद्र वासुदेव चौधरी हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांच्या मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत, बिराडवाडी येथे संदेश पोपट निकम (35) विसर्जन करताना घसरले आणि पाण्यात बुडाले. त्यांचा मृतदेह बाहेर काढून चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
या तिन्ही घटनांमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी माहिती दिली की, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक मोठ्या संख्येने नद्या, तलाव आणि विहिरींवर विसर्जनासाठी जमले होते. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सुरक्षा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हे अपघात झाले.