Pune Mhada Lottery: मोठी घोषणा ! पुणेकरांच्या हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार, 4186 घरांची लॉटरी
पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरात घर घेण्याची इच्छा असणाऱ्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने 4186 घरांच्या भव्य सोडतीची घोषणा केली आहे. या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 219, म्हाडा गृहनिर्माणात 1683, 15 टक्के सामाजिक गृहनिर्माणात 864 आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहयोजनेत 3322 घरे उपलब्ध आहेत. इच्छुकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. त्याच दिवशी ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकारण्याचीही सुरुवात होईल. अर्जदारांना 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे अनामत रक्कम ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11.59 पर्यंत ठेवली आहे. जे अर्जदार बँकेद्वारे RTGS/NEFT पद्धतीने रक्कम भरणार असतील, त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेतच पैसे भरावेत. हेही वाचा: Weather Report : 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, सतर्कतेचाही आदेश
सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्राथमिक यादी 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रसिद्ध होईल. या प्राथमिक यादीवर दावे किंवा हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अंतिम यादी 17 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता घरांच्या सोडतीचे आयोजन केले जाईल. निवड झालेल्या (यशस्वी) अर्जदारांची नावे त्याच दिवशी सायंकाळी 6:00 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील.
म्हाडाच्या या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असून सोयीसाठी अर्जदारांनी सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यावी. नोंदणी, अर्ज भरणे, रक्कम भरणे व सोडतीसंबंधी सर्व घडामोडी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून अर्ज सादर करावा.