सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील येवती रोपळे

सोलापूरमध्ये दर्शनावरुन येताना पती-पत्नीवर गोळीबार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील येवती रोपळे रस्त्यावर पूर्व वैमन्यसातून पती-पत्नीवर गोळीबार करण्यात आला आहे. हा प्रकार भरदुपारी घडला आहे. मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे. देवदर्शन करून येत असताना सोलापूरातील पती पत्नीवर गोळीबार करण्यात आला. 

सोलापूरात पूर्व वैमन्यसातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार शिवाजी कुंडलिक जाधव आणि त्यांची पत्नी सुरेखा कुंडलिक जाधव हे दोघे पंढरपूर येथून देवदर्शन करून येत असताना येवती रोपळे रस्त्यावर निर्जन ठिकाणी दशरथ केरू गायकवाड याने पूर्व वैमन्यसातून त्याच्यावर अंदाजे चार फायर राऊंड केल्या. यामध्ये शिवाजी जाधव किरकोळ तर सुरेखा जाधव या गंभीर दुखापत झाली आहे. त्या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी जखमींना उपचारासाठी तातडीने पंढरपूर येथील दवाखान्यात हलवले.

हेही वाचा : मुंब्य्रात 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या

दरम्यान, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी भेट दिली. गोळीबार झालेल्या ठिकाणावरून पोलिसांना दोन जिवंत काडतूसे, दोन मॅक्झिन सापडले आहेत. आरोपी गोळीबार केल्यानंतर पसार झाला असून त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं सोलापूरात काय घडलं? शिवाजी जाधव आणि त्यांची पत्नी सुरेखा जाधव पंढरपूर येथून देवदर्शन करून निघाले असताना येवती रोपळे रस्त्यावर त्यांच्यावर गोळीबार झाला. पूर्व वैमन्यसातून ही गोळीबाराची घटना घडली असल्याची माहिती आहे. दशरथ केरू गायकवाड याने गोळ्या झाडल्याची माहिती आहे. गोळी झाडताना चार राऊंड फायर करण्यात आल्या. यावेळी शिवाजी जाधव यांना गोळी लागली. तर त्यांच्या पत्नी सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. यानंतर रस्त्यावरून जा-ये करणाऱ्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर येत शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव यांना रुग्णालयात हलवले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दशरथ गायकवाड याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.