मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, महिलेसह मुलगा जखमी
शिवाजीनगर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेतायत, कोण आहेत हे तीन अनोळखी आरोपी?
बीड : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात असलेल्या गंगाधर काळकुटे यांच्या गाडीने शुक्रवारी सायंकाळी पाटोदा तालुक्यातील कचारवाडी गावाजवळ एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला आणि तिचा मुलगा खाली पडले. त्यानंतर घटनास्थळी बाचाबाची झाली आणि वाद मिटला, असे वाटत असतानाच रात्री धक्कादायक प्रकार घडला.
अपघाताच्या काही तासांनंतर रात्री उशिरा तीन अनोळखी व्यक्तींनी सदरील महिलेच्या घरात घुसून, "आमच्या ताफ्याच्या गाडीला का अडवलेस?" असा जाब विचारला. त्यांनी शिवीगाळ करत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी महिलेवर काठीने हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे संभाजीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर महिलेकडून तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार, पोलिसांनी तीन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हे कृत्य नेमके कोणाच्या सांगण्यावरून केले, याचा तपास पोलीस करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील गाडी अपघातात सहभागी असल्याने हा विषय अधिक चर्चेत आला आहे. घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सध्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत. 👉👉 हे देखील वाचा : रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? व्हॉट्सअप स्टेटसवरून चर्चांना उधाण