मराठीची लेकरं म्हणून रिंगणात उतरू; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
मुंबई: शनिवारी वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे ठाकरे बंधूंचा भव्य विजय मेळावा पार पडला. व्यासपीठावर ठाकरे बंधूंनी एकमेकांची गळा भेट घेतली आणि हा क्षण पाहताच अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला. या कार्यक्रमानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली. आव्हाड म्हणाले की, 'माय मराठीच्या सन्मानार्थ उभा राहत असलेल्या या लढ्यात आपण सगळेच,मराठीची लेकरं म्हणून रिंगणात उतरू'.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
ठाकरे बंधूंच्या भव्य विजयी मेळाव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी एक्सवर प्रतिक्रिया दिली. 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र पाहिल्यावर, या मातीतील तमाम मराठी माणूस सुखावला असणार आहे. माय मराठीच्या सन्मानार्थ उभा राहत असलेल्या या लढ्यात आपण सगळेच,मराठीची लेकरं म्हणून रिंगणात उतरू', असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी आणलं आदित्य-अमितला एकत्र
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. यादरम्यान, व्यासपीठावर मनसे नेते अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी, शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेत अमित ठाकरेंना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आणि आदित्य ठाकरेंना राज ठाकरे यांच्या बाजूला उभं केलं. तेव्हा, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला.