मनीषा बिडवे या महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक
बीड: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप होत असलेल्या कळंब येथील मनीषा बिडवे या महिलेची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. राहत्या घरात मनीषा बिडवे यांचा मृतदेह आढळल्यामुळे हत्येचे गूढ आणखी वाढले. मात्र, याप्रकरणी आता मोठी बातमी समोर आली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
कळंब येथे हत्या झालेल्या मनीषा बिडवे यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा यांना जीवे मारणाऱ्या आरोपीच्या घरी हा मोबाईल सापडला आहे. या आरोपीचे नाव रामेश्वर उर्फ राण्या भोसले आहे. सापडलेला मोबाईल बंद आहे आणि या मोबाईलच्या माध्यमातून मनीषा बिडवे यांची हत्या नेमकं कोणत्या कारणामुळे झाली असावी याची माहिती पोलिस शोधत आहेत. लवकरच पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कळंब येथील मनीषा बिडवे यांच्या हत्याप्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
आरोपी बीडच्या केज गावातील रहिवासी:
मनीषा बिडवे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ राण्या भोसले हा बीडच्या केज गावातील रहिवासी असून तो संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुदर्शन घुले याच्या गावात उसतोडणीच्या कामाला होता.
आरोपींना नऊ दिवसाची पोलीस कोठडी:
मनीषा बिडवे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. या आरोपींनी नेमकं कोणाच्या सांगण्यावरून ही हत्या केली असावी? हे आरोपी नेमकं कोणाच्या संपर्कात होते? हा प्रश्न न्यायालयामध्ये सरकारी वकील शिवलकर यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
'या' कारणामुळे मनीषा बिडवे यांची हत्या झाली:
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा बिडवे बीडच्या कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीमध्ये एकटी राहत होती. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा हे मनीषा बिडवे यांचे जन्मगाव आहे. तर बीड जिल्ह्यातील आडस हे मनीषा बिडवे यांचे माहेर आहे. मुख्य आरोपी रामेश्वर भोसले मनीषा बिडवे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. या कालावधीत, रामेश्वर भोसले आणि मनीषा बिडवे यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. इतकंच नाही, तर याचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मनीषा यांनी काढले. नंतर मनीषा बिडवे यांनी हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून आरोपी रामेश्वर भोसलेला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. हा प्रकार वारंवार घडत असल्यामुळे, ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर आरोपी रामेश्वर भोसलेने मनीषा यांची हत्या करण्याचे ठरवले. त्यानंतर, 22 मार्च रोजी दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून आरोपी रामेश्वरने मनीषा बिडवे यांची हत्या केली.