Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; वाहनांची तोडफोड, दुकानांची नासधूस, पोलिसांचा तपास सुरू
पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये साडे सतरा नळी येथे पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. काही टवाळखोरांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार वाहनांची तोडफोड केली. तसेच एका स्वीट मार्टच्या दुकानात घुसून कोयत्यानं तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना साडे सतरा नळी चौकात सोमवारी सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत अज्ञात तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन चौकामध्ये सर्वे नं. 203 येथील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि कार अशा चार वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर तेथील एका स्वीट स्मार्टच्या दुकानात लोखंडी हत्यारानं दुकानातील वस्तूंचं नुकसान केलं.
चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी हातात कोयता घेत ही दहशत माजवली. त्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्हीद्वारे तोडफोड करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात असून हडपसर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीविरोधात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.