Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना खुशखबर! फेब्रुवारी हप्त्याच्या तारखेची घोषणा
Aditi Tatkare on Ladki Bahin : राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत एक महत्वाची अपडेट आली आहे. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना सुरू केली आहे. पण या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता. हा हप्ता कधी मिळणार याबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी झालेल्या मंत्री आदिती तटकरे यांनी यासंबंधी मोठी घोषणा केली आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘८ मार्च रोजी महिलांसाठी विशेष विधीमंडळ सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात महिलांसाठी विविध महत्त्वाचे निर्णय जाहीर केले जातील. याच दिवशी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.’
सरकार भविष्यात योजनेचे निकष कठोर करून लाभार्थ्यांची संख्या कमी करेल किंवा योजना बंद केली जाईल, अशी चर्चा आहे. पण याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे सांगितलं आहे. महायुती सरकारच्या धोरणात महिला कल्याण हा महत्त्वाचा घटक आहे. पात्र महिलांना योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे.