Laxman Hake On Manoj Jarange: सरकारने GR काढताच हाके संतापले, राधाकृष्ण विखे पाटलांची लाज काढली
पुणे: मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्टपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु होते. मात्र मंगळवारी म्हणजेच 2 सप्टेंबरला जरांगेंचं उपोषण थांबलं कारण सरकारने त्यांच्या सहा मागण्या मान्य केल्या. मनोज जरांगे पाटील यांनी प्रमुख आठ मागण्या केल्या होत्या. त्यातील सहा मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर आझाद मैदानावर पाच दिवस सुरु असलेलं उपोषण अखेर थांबलं आणि मराठा समाज आपल्या मार्गाने निघाला. सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेला जीआर बेकायदेशीर म्हटलं आहे. 'जरांगेंना मदत करणाऱ्या नेत्यांवर बहिष्कार'
राज्य सरकारने मराठा आरक्षणसंबंधी काढलेला जीआर पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सरकारला बेकायदेशीर जीआर काढण्याचा अधिकार नाही. तसेच मंगळवारच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आले आहे. मराठ्यांना आणि मनोज जरांगे पाटलांना ज्या ज्या नेत्यांनी मदत केली, त्या सगळ्या नेत्यांवर बहिष्कार टाकणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
'अनेक नेत्यांनी जरांगे यांना पायघड्या घातल्या'
ओबीसीचा लढा सुरु आता होणार आहे. भुजबळ साहेबांच्या लढाऊ वृत्तीचे अभिनंदन करणार आहे. भुजबळ साहेबांनी मोठा लढा उभा केला आहे. आज गोपीनाथ मुंडे यांची आठवण येत आहे. हा महाराष्ट्र मराठी माणसाचा नाही तर मराठा समाजाचा आहे, हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे. अनेक नेत्यांनी जरांगे यांना पायघड्या घातल्यात असं म्हणत हाके यांनी राधाकृष्ण विखेपाटलांवर निशाणा साधला आहे.
'ओबीसी आरक्षण संपले' ओबीसी आरक्षणावर सत्तेतील ना विरोधी पक्षातील नेते बोललेत. इथल्या नेत्यांना फक्त मराठा समाज दिसतोय. ओबीसी आरक्षण संपले आहे. जीआर आम्हाला जेवढा समजतो त्यानुसार ओबीसी आरक्षण संपले आहे. तायवडे साहेबांना जीआर समजला नाही असं वाटतंय. पुढच्या दरवाज्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळतं नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
'राधाकृष्ण विखे पाटलांना लाज वाटली पाहिजे' राधाकृष्ण विखे पाटील यांना जास्त समजतं का? सोशल जस्टीस त्यांना समजतं का? कारखानदारांचे नेते व्हायचं आहे त्यांना, लाज वाटली पाहिजे त्यांना असं वक्तव्य करतांना तुम्हाला असा जीआर काढण्याचा अधिकार कुणी दिला,त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये अस जोरदार हल्लाबोल हाकेंनी विखे-पाटलांवर केला आहे.
'ओबीसीची संघर्ष यात्रा सुरु करणार' दरम्यान ओबीसीची संघर्ष यात्रा सुरु करणार आहे. मराठवाड्यातून आरक्षण यात्रा सुरु करणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. ओबीसी समाजाने या यात्रेत सहभागी व्हायला पाहिजे असे आवाहनही त्यांनी ओबीसी बांधवांना केले आहे.