नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे ल

Nanded: नांदेडच्या मुखेड तालुक्यात आभाळ फाटलं; लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, सैन्य तैनात

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे लेंडी धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या धोकादायक पातळीमुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ येथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. काल येथे 206 मिमी इतका पाऊस झाला असून शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून येणाऱ्या पाण्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून उर्वरित नागरिकांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू आहेत. हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले, तर भासवाडी आणि भिंगेली येथे अनुक्रमे 20 आणि 40 नागरिक सुरक्षित आहेत. मात्र, सध्या 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. हेही वाचा: Heavy Rain Alert : मुंबईसह उपनगराला पावसानं झोडपलं; राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी जिल्हाधिकारी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून नांदेड, लातूर आणि बिदर जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहेत. एनडीआरएफची एक चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू बचाव कार्यात सक्रिय आहे. छत्रपती संभाजीनगरहूनही सैन्याची तुकडी रवाना करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला प्रभावित भागात सतत संपर्क साधून नागरिकांची मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यभरात रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून अनेक नद्यांचे पाणी ओसंडून वाहत असल्याने सरकारने सर्वांचे सुरक्षा उपाय वाढवले आहेत.

राज्यातील नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी प्रशासन आणि बचाव यंत्रणा पूर्ण सज्ज आहेत. पावसाळ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.