अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का? तुमच्या सारखे ५६ पायाला बांधून फिरते; चित्रा वाघांचा सभागृहात हल्लाबोल
मुंबई : दिशा सालियान प्रकरणावरून आज विधिमंडळाच्या सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या मुद्द्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं.
सत्ताधारी पक्षाने या प्रकरणावरून नाव न घेता थेट शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावरून विरोधी पक्षातील आमदारांनी ठाकरे यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला. या वादात विधानपरिषदेत बोलताना आमदार अनिल परब यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
हेही वाचा - LIC's Bima Sakhi: दहावी उत्तीर्ण महिला दरमहा 7 हजार रुपये कमवू शकतात, जाणून घ्या
परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. ते सभागृहात म्हणाले की, ‘महायुतीमधील मंत्री संजय राठोड आणि जयकुमार गोरे यांच्या प्रकरणांबाबत कोणीही बोलत नाही. त्यांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारला विरोधी पक्ष कमकुवत वाटत असल्याने त्याला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.’
अनिल परब यांनी चित्रा वाघ यांचं नाव घेताच त्या चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी परब यांच्यावर आक्रमक हल्लाबोल केला. चित्रा वाघ संजय राठोड यांच्या मंत्रीपदाबाबत बोलताना म्हणाल्या की, ‘मी ५६ परब पायाला बांधून फिरते. उद्धव ठाकरे यांना विचारा, त्यांनी संजय राठोड यांना का क्लीन चिट दिली. हिंमत असेल तर त्यांना हे विचारण्याची तयारी ठेवा.’
हेही वाचा - कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा – महसूल मंत्री बावनकुळे
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ‘माझं नाव घेतलं गेलं म्हणून मी उत्तर देत आहे. तुम्ही असाल पोपट पंडित. पण माझं कुटुंब दोन वर्षे जे सहन करत आहे. त्याचा तुम्हाला अंदाजही नाही. मी वशिल्याने इथे आले नाही. मेहनतीने काम केलं आहे.’
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणावरून सभागृहात वातावरण तापलं आहे. आगामी दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.