Rain Update : मुंबईमध्ये पावसाचे थैमान ! जाणून घ्या कुठे किती पाऊस झाला ?
गेल्या दोन दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं आहे.
रेल्वे वाहतूक विस्कळीत : सध्या मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने, हार्बर रेल्वे पाच मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वेची सुरळीत सुरू आहे. पावसाचा जोर आणखी वाढला तर रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम होऊ शकतो.
जाणून घ्या कुठे किती पाऊस झाला ? - विक्रोळी 69 मिमी - सायन 67 मिमी - टाटा पॉवर चेंबूर 81.5 मिमी - सांताक्रूझ 70 मिमी - बांद्रा 54 मिमी - कुलाबा 22 मिमी - जुहू 58 मिमी - भायखळा 58 मिमी
या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील म्हणजेच दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, 18 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर केली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - Nanded: नांदेडच्या मुखेड तालुक्यात आभाळ फाटलं; लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, सैन्य तैनात
राज्यातील पूरग्रस्त भागाचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरू रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.