PMPML Bus Driver Suffers Heart Attack: पुण्यात मोठा अपघात टळला! चालत्या पीएमपीएमएल बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका; वाहतूक पोलिसांनी CPR देऊन वाचवले प्राण
PMPML Bus Driver Suffers Heart Attack: पुण्यातील लक्ष्मी रोडवर सोमवारी संध्याकाळी एक मोठा अपघात टळला. गणेशोत्सवाच्या गर्दीत पीएमपीएल बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला. परंतु पुणे वाहतूक पोलिसांच्या हवालदारांच्या तत्परतेमुळे चालकाचा जीव वाचला. सोमवारी सायंकाळी 7:15 वाजता बेलबाग चौकाजवळ ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. गाडी चालवताना ते बेशुद्ध पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मदतीसाठी प्रवासी ओरडू लागले.
दरम्यान, वाहतूक नियमनाची जबाबदारी सांभाळत असलेले हवालदार रोमेश धावरे आणि महिला हवालदार अर्चना निमगिरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकांच्या मदतीने अंबुरे यांना बसमधून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला फूटपाथवर ठेवले. पोलिसांनी तात्काळ चालकाला सीपीआर दिले. त्यानंतर काही मिनिटांतच चालकाला शुद्ध आली.
यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता चालकाला तातडीने रिक्षातून रुग्णालयात नेले. या कामात स्थानिक रिक्षाचालक राजेश शंकर अर्कल यांनी सहकार्य केले. फरासखाना वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी संदीप मधले (सहाय्यक पोलिस निरीक्षक) आणि संजय गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रयत्न यशस्वी झाले. वेळेवर उपचार मिळाल्याने चालकाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
हेही वाचा - Ganeshotsav 2025 : डोंबिवलीतील माणकोली उड्डाणपूल चार दिवस राहणार बंद; विसर्जनादरम्यान वाहतुकीतही बदल
या घटनेनंतर पोलिस हवालदार रोमेश धावरे आणि अर्चना निमगिरे यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीत लक्ष्मी रोडसारख्या गजबजलेल्या भागात मोठा अपघात टळल्याने नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेचे अभिनंदन केले आहे. या घटनेमुळे पोलिसांचे मानवीय आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर आले आहे.