मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागण्यांसह विव

Manoj Jarange: 29 ऑगस्टला जरांगेंची तोफ मुंबईत धडाडणार, मुंबईला जाण्याचा मार्ग ठरला

छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी मुंबईवर मोर्चा काढणार आहेत. येत्या 29 ऑगस्टला त्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईत आल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यामुळे सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण मनोज जरांगे मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई मोर्चा संदर्भात मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय. गावोगावी दौरे करुन त्यांनी समाजाच्या बैठका घेतल्या आहेत. आता मुंबईला जाण्याचा मार्गही त्यांनी ठरवला आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत धडकणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मराठा समाज मुंबईत धडकल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहे. वेगवेगळ्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मुंबईत आंदोलन करणार आहेत. 

हेही वाचा: Uddhav Thackeray On Modi: 'सिंदूर कुठे गेला...त्याचं कोल्ड्रिंक्स झालं का?'; उद्धव ठाकरेंची मोदींवर सडकून टीका

काय आहेत मनोज जरांगे यांच्या मागण्या? मराठा-कुणबी एक आहेत हा अध्यादेश काढावा. हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट लागू करा. सगे सोयरेबाबत अंमलबजावणी करावी. आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे. मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी. कुटुंबातील सदस्यांना नोकरी दिली जावी. शिंदे समितीला कार्यालय दिलं जावं. नोंद सापडताच लगेच प्रमाणपत्र दिलं जावं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. आरक्षण घेतल्याशिवाय परतीचा प्रवास नाही असा इशाराही जरांगेंनी दिला आहे. 

या मार्गाने मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार  मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे आंतरवलीतून 27 ऑगस्टला निघाल्यानंतर शहागड, पैठण, शेवगाव,पांढरीपूल, अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर,मंत्रालय अशा मार्गाने मुंबईला येणार आहे. तर पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक, मुंबई अशा पर्यायी मार्गनेही ते मुंबईला येऊ शकतात.